धुळे - भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात योग्य तो सन्मान मिळत नसल्याने आणि मनपा निवडणुकीच्या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्यामुळे ते राजीनामा देणार आहेत. याबाबत राज्यातील सर्व आमदारांना त्यांनी पत्र देखील लिहीले आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने अनिल गोटे यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवले आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे आणि अनिल गोटे यांच्यात अंतर्गत वाद आहे. त्यामुळे आता हा वाद शिगेला पोहचला असून आ.गोटेंनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. १९ नोव्हेंबरला अनिल गोटे विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. गोटेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
















